शिक्रापूर, (ता. शिरूर)सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारे शिक्रापूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.रक्तसंकलनाचे कार्य यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले.
या शिबिराचे उद्घाटन आदरणीय ताराचंद करकचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे, शिवसेना शिरूर तालुकाध्यक्ष सरपंच रामभाऊ सासवडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, तसेच करंदी, कासारी, पिंपळे धुमाळ, पिंपळे जगताप, शरदवाडी आदी परिसरांतील अनेक महात्मा आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनचे मार्गदर्शक बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी दिलेला संदेश “रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे” या कार्यातून साकारण्यात आला असून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मिशनचे हे सेवाकार्य सातत्याने सुरू आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी सेवादल व मिशनच्या अनुयायांचे विशेष योगदान लाभले. शिक्रापूर परिसरात घरोघरी जाऊन रक्तदान जनजागृती करण्यात आली.शेवटी, शिबिरास आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे जयराम सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले.
सामाजिक उपक्रमांची परंपरा: संत निरंकारी मिशनतर्फे शिक्रापूर परिसरात वेळोवेळी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, महिला सशक्तीकरण, बालकल्याण आणि नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सेवाकार्याची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारने मिशनचा वेळोवेळी गौरव केला आहे.