शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी निमगाव म्हाळुंगी येथे छापा मारत चेतन शिंदे आणि त्याचे साथीदार ओंकार अडक (वय १९) व शरद माने (वय २१) यांना अटक केली. आरोपींनी मध्यप्रदेशमधून पिस्टल विकत घेतल्याचे सांगितले आहे.
तिन्ही आरोपींविरूध्द शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार रोहीदास पारखे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी शिरूर प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, प्रतिक जगताप यांचे पथकाने केली आहे.