प्रतिनिधी पत्रकार राजाराम गायकवाड
शिक्रापूर (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांना केवळ जागतिक अपंग दिनासारख्या एकाच दिवशी मान-सन्मान न मिळता, तो कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले. शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

लुसी कुरियन यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, समाजाने दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांना समान नागरिक म्हणून आदराने वागवले पाहिजे. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी व समस्यांवर आत्मविश्वासाने मात करावी, असे आवाहन केले.
शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर व सुभाष खैरे यांनीही आपल्या मनोगतातून अपंग दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकर कळमकर, सुनील चौधरी, सुशील पोहेकर, सुमित इंगळे, परदेशी पाहुणे डॉ. कारविन, आनसी, तेजस्विनी पवार, गोरख कुंभार, सुरेश पाटील, योगिता पाटील, सुरेश टेमगिरे तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित इंगळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रमेश दूतोंडे यांनी मानले.
