प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त ठेवणे हा होता. यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आणि त्यांना प्लास्टिक व पॉलिथीनचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं. मंदिरांच्या शेजारी ‘पर्यावरणपूरक मंदिर’ आणि ‘हरित घर व पॉलिथीनमुक्त परिसर’ असे फलक लावण्यात आले.
या उपक्रमात एकूण १०० बेल आणि कौटची रोपे, तसेच १५० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याची सवय लागेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. तसेच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि सरपंचांना ‘पर्यावरणपूरक मंदिर’ आणि ‘हरित घर’ या संकल्पनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या मोहिमेत १९८७ च्या बॅचमधील सुमारे २५ ते ३० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या या प्रयत्नांना गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे साथ दिली. सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत असून, भविष्यातही या मोहिमेचा पाठपुरावा करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.