पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.
पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत होते. “नई सोच, नई राह, निश्चिंत होकर तय करें विवाह” या चर्चासत्रात त्यांनी नव्या पिढीला अधिक विश्वासाने जबाबदाऱ्या सोपवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
समस्या समजून नव्या पिढीला मार्गदर्शन करा – सकाळच्या सत्रात “प्रतिबंब” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. नंदकिशोर साखला यांच्या सूत्रसंचालनाखाली मनोज लुंकड, प्रकाश गुलेचा, आरती लोढा, आणि श्रवण डुगर यांसारख्या मान्यवरांनी नव्या व जुन्या पिढ्यांमधील विचारसरणीत बदल कसा करावा, यावर आपले विचार मांडले.
तरुण पिढीने सादर केलेल्या नाटिकेत नवीन व जुन्या पिढ्यांतील सुसंवादाचा मुद्दा उठवला. बदल स्वीकारण्याची गरज आणि परस्पर समजूत ही काळाची गरज असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
लग्नासाठी योग्य वयाचे महत्त्व – शांतीलाल मुथ्था यांनी आपल्या भाषणात सध्याच्या विवाहप्रश्नांवर प्रकाश टाकला. “शिक्षण आणि करिअरच्या मागे राहून अनेकजण लग्न उशिरा करतात. परिणामी, वय वाढल्यावर योग्य जोडीदार शोधणं कठीण होतं. म्हणूनच वयाच्या २०व्या वर्षीच तरुणांना जोडीदार निवडण्याचा अधिकार द्या. आपली पिढी सक्षम आहे, त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवा,” असे त्यांनी सांगितले.
जैन समाजाने राष्ट्र उभारणीसाठी अनमोल योगदान द्यावे – दुपारच्या सत्रात प्रफुल्ल पारख यांनी जैन समाजाच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा करत, त्यांना राष्ट्रसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “दानधर्मात अग्रेसर असलेल्या जैन समाजाने देश उभारणीतही हातभार लावला पाहिजे,” असे ते म्हणाले.
‘नई सोच’ मुळे समाजाला नवी दिशा – चर्चासत्राच्या समारोपात नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल सदस्यांची घोषणा करण्यात आली व त्यांचा सत्कारही झाला. “समाजातील तरुणांना विश्वास आणि स्वातंत्र्य दिल्यास विवाहासारख्या गंभीर प्रश्नांवर प्रभावी तोडगा निघू शकतो,” असा आशावाद अधिवेशनातून व्यक्त झाला.