दिल्ली: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकमेव आदर्श सरपंच म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच, संदीप ढेरंगे यांची निवड झाली आहे. या विशेष निमंत्रणामुळे पुणे जिल्ह्यासह कोरेगाव भीमा गावासाठी हा एक मोठा सन्मान आहे.या गौरवपूर्ण क्षणापूर्वी सरपंच संदीप ढेरंगे यांनी पत्नी अंजली ढेरंगे आणि गावकऱ्यांसह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.
विकासकामांचे कौतुक – या भेटीदरम्यान, सरपंच ढेरंगे यांनी कोरेगाव भीमा येथे सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यांनी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी वन विभागाची जागा मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न आणि श्री नरेश्वर महाराज तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याचे काम तसेच केलेली विकास कामे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावातील शेती आणि उद्योगांसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठी मदत होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रण – संदीप ढेरंगे यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने त्यांना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रित केले आहे. त्यांच्या या कार्याची मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशंसा केली आणि पुढील विकासकामांसाठी त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे,माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्या रेखा तानाजी ढेरंगे, जयश्री दिपक गव्हाणे, कोमल प्रदीप खलसे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंजली संदीप ढेरंगे, दीपक उत्तम गव्हाणे, तानाजी शंकरराव ढेरंगे, प्रदीप दशरथ खलसे, आशुतोष देवकर उपस्थित होते.