सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ॲक्टिव्ह क्रॉमवेल एक्झॉस्ट प्रा. लि. यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळ्याला ॲक्टिव्ह क्रॉमवेलच्या एचआर मनीष कोरडे, सीमा केदारी, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, आणि ॲड. विजयराज दरेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथालयाच्या ज्ञानाने अधिकारी घडावेत – माजी उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा सल्ला दिला व येथून अधिकाधिक अधिकारी,शास्त्रज्ञ व सुजाण नागरिक घडावेत असे विचार व्यक्त केले.. सीमा केदारी यांनी विद्यार्थ्यांना आत्ताच ध्येय निश्चित करून त्याच्या दिशेने प्रगती करण्याचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रांची माहिती मिळवून देण्याचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष आनंदराव हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, माजी उपसरपंच सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, उद्योजक रामदास दरेकर, दगडू दरेकर, आणि ग्रंथालय प्रमुख रोकडे सर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदे मनिषा यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अशोक दरेकर यांनी केले.
ग्रंथालयाच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होणार असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होवून समृद्ध वैचारिकता असणाऱ्या सुजाण मानवतावादी पिढीची निर्मिती होणार आहे. – उपसरपंच राजेंद्र दरेकर