मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट
वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार आहे. धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे या मॅरेथॉनला उपस्थित राहणार आहेत.(Wagholi)
वाघोलीकरांच्या पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, सांडपाणी समस्या आणि मालमत्ता कर अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. “उभे राहा आणि आपल्या हक्कांसाठी धावा!” असे आवाहन करत, ही मॅरेथॉन केवळ धावण्यापुरती नसून वाघोलीच्या समस्यांवर एकत्र येण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणार आहे.(Run For wagholi)
स्पर्धेतील सहभाग – मॅरेथॉनमध्ये वयानुसार चार गटांमध्ये नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे: युवक गट (१४ ते १८ वर्षे), तरुण गट (१८ ते २४ वर्षे), प्रौढ गट (२५ ते ४४ वर्षे), आणि ज्येष्ठ गट (४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे). प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक गटातील तीन महिला आणि तीन पुरुष विजेत्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान केले जाईल.(Amdar Ashok Pawar)
मॅरेथॉन दरम्यान सोयीसुविधा – मॅरेथॉन दरम्यान प्रत्येक ८०० मीटरवर पाण्याची सोय, अल्पोपहार, मार्गदर्शन सहाय्य, झुंबा आणि अरबी परफॉर्मन्ससह मनोरंजन, संपूर्ण वैद्यकीय सहाय्य, रुग्णवाहिका, आणि ड्रोन कॅमेरा कव्हरेजसह एलईडी स्क्रीनवर लाइव्ह प्रसारण यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एक एक रुपया महापालिकेला भेट – महानगर पालिका सोयीसुविधा व्यवस्थित देत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते याचा निषेध म्हणून सहभागी वाघोलीकरांनी आपल्या हक्कांसाठी सर्वांनी येताना एक रुपया सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेली एक एक रुपयांची जमा झालेली रक्कम महापालिकेला भेट दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून यामुळे महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा पुरवाव्यात असा अनोखा संदेश या मॅरेथॉनद्वारे दिला जात आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था – मॅरेथॉनचा शेवट दत्तकृपा पार्किंग, बकोरी फाटा, लेक्सिकॉन शाळेसमोर, पुणे नगर रोड, वाघोली येथे होणार आहे. या मॅरेथॉन दरम्यान लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. रावलक्ष्मी फाऊंडेशनने मोठ्या संख्येने नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.