धक्कादायक! राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्यांच्या खुनाने परिसर हादरला, बॅरलमध्ये आढळले मृतदेह

Swarajyatimesnews

राजगुरुनगर (ता. खेड): वाडा रस्त्यावरील एका वर्दळीच्या वस्तीत दोन लहान चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. नऊ आणि आठ वर्षांच्या या सख्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये सापडले. गुरुवारी (ता. २६) उघड झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  

      बुधवारी दुपारी या दोन बहिणी बाहेर खेळत होत्या. मात्र, त्या परतल्या नाहीत. मुली हरवल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी परिसरात शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पालकांनी खेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली.  

 तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असता, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बियर बारमध्ये काम करणाऱ्या एका वेटरच्या खोलीची तपासणी केली. या खोलीत गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

अत्याचार की केवळ खून-  पोलिस तपासात सध्या तरी या मुलींवर अत्याचार झाला की नाही, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे मुलींच्या पालकांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळेल, असे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.  

आई-वेटरचे संबंध आणि आरोपीचा गुन्हा –  संशयित आरोपी वेटर हा सुमारे ५० ते ५५ वर्षांचा असून, त्याचा मुलींच्या आईशी प्रेमसंबंध होता. या कारणावरून वेटरने हे भयानक कृत्य केले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.  

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलींपैकी मोठी मुलगी वेटरच्या खोलीत गेली असता, त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती मोठ्याने ओरडत असल्याने तिची लहान बहिण वर आली. बिंग फुटेल या भीतीने वेटरने लहान मुलीला ठार मारले. यानंतर मोठ्या मुलीचाही खून करून दोघींना बॅरलमध्ये टाकून आरोपी पळून गेला.  

आरोपीला अटक –  पोलिसांनी तपास वेगाने करत आरोपीला पुण्यातील एका लॉजवरून पहाटे अटक केली. आरोपीविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.  

नातेवाईकांचे पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन – आई वडील, नातेवाईक यांना घेऊन महिलांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा, ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.मोठया मुलीवर बलात्कार, तो करण्याआधी लहान मुलीला हौदात बुडवून आरोपीने ठार केल्याचे समजते अघोरी कृत्य करून त्यातच मोठया मुलीला टाकून आरोपीने पलायन केले.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची खेड पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती.

शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपास – मुलींचे शवविच्छेदन चांडोली ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण, तसेच अत्याचार झाला की नाही, याबाबतचा तपशील लवकरच उघड होईल.  

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेत दोषी ठरणाऱ्या आरोपीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!