पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
लोणीकंद (ता.हवेली) पुण्यातील लोणीकंद परिसरात हुंडाबळीची एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणारा सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २२ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी यशवंत लाटे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
याप्रकरणी मृत वैष्णवीची आई गंगाबाई अशोक जामकर (वय ४८, रा. वडगाव गुंडा, जि. बीड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती यशवंत शिवनाथ लाटे (वय २८), सासू सखूबाई लाटे (वय ५०), सासरे शिवनाथ लाटे (वय ५५) आणि दीर सुरज लाटे (सर्व रा. गोकुळ पार्क, बकोरी रोड, लोणीकंद) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी सासरी नांदत असताना मे २०२५ पासून तिला सासरच्या मंडळींनी लक्ष केले होते. “तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये” अशी वारंवार मागणी करत तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. सासरच्या या असह्य जाचाला कंटाळून अखेर वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून लोणीकंद विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती डंबाळे आणि तुकाराम सुरवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.
