एकाच कुटुंबातील तीन अधिकारी सांभाळणार पुण्याचा कार्यभार
राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- डुडी कुटुंबाचा तिहेरी कार्यभार –
- जितेंद्र डुडी: पुण्याचे नवे जिल्हाधिकारी
- आंचल दलाल: राज्य राखीव दलात (SRPF) कार्यरत आयपीएस अधिकारी आणि जितेंद्र डुडी यांच्या पत्नी
- शेखर सिंह: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि डुडी यांचे मेहुणे
पुण्यातील प्रशासकीय व्यवस्थेत मोठा बदल झाला असून, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे डुडी कुटुंबातील तीन अधिकारी आता पुण्याच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. डुडी कुटुंबाच्या या तिहेरी कार्यभारामुळे पुण्याच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
प्रशासकीय बदल्यांचा निर्णय: राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना सचिवपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांची जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले.
जितेंद्र डूडी यांनी पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार – पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.
जितेंद्र डूडी यांनी केलेले काम व प्राप्त पुरस्कार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.
जितेंद्र डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत ५ व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन २०२४ च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.