कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
पेरणे फाटा येथे विजय स्तंभाकडे जाणाऱ्या व व्ही आय पी रोड लगत असणाऱ्या भंगार दुकानाला अचानक आग लागली आगीने रौद्र रूप धारण केल्याने सलून, सर्व्हिस सेंटर, टायरचे दुकान, आचारी दुकानांना आगीची झळ पोचली तर आगीमध्ये विजेच्या तारा जाळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
मध्यरात्री वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून गॅस टाक्यांच्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भडकलेल्या व रौद्ररूप धरण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे मोठे आव्हानात्मक होते.
ग्रामीण पोलिस दलाच्या सुजाता कापरे यांची कर्तव्य तत्परता – पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस सुजाता कापरे – भुजबळ यांनी आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल व इतर मदत तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न केले असून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले.
यावेळी लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतीसाठी पोलिस यंत्रणा पाठवली तर वाघोली येथील अग्निशमन दलाचे वाहन चालक संदीप शेळके, अल्ताब पटेल, फायरमन प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, मयूर गोसावी, सुरज इंगवले, महेश पाटील यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.