गावात कोणाचा मृत्यूच झाला नाही, पण स्मशान भूमीत कुणाचे प्रेत जाळले यावरून संशय..काही अंतरावर रक्ताचे डाग…
तावशी (ता.इंदापूर) येथील स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी लाकूड व हाडाच्या राखेवरून लावून खून करणाऱ्या दोघांना अटक केले.चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे खुनाचा तपास लावल्याने ग्रामस्थांना पोलिसांचे कौतुक केले. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०), विशाल सदाशिव खिलारे (वय २३ रा.दोघे, रा. गोळखी, ता. फलटण, जि. सातारा) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली. या दोघांनी हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४, रा. गंगाखेड जि. परभणी) या व्यक्तीचा खून केला होता.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावशी गावामध्ये १६ नोव्हेंबर रोजी स्मशानभूमीमध्ये सकाळी काहीतर जळत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना हाडे, राख व निखारे सापडले. ही हाडे मनुष्याची आहेत की, प्राण्याची आहेत, याची माहिती मिळत नव्हती. स्मशानभूमीमधील राख चाळल्यानंतर त्यांना राखेमध्ये दातच्या कॅप व चाव्या सापडल्या. तसेच स्मशानभूमीपासून काही अंतरावर जमिनीवरही रक्त सांडल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय आला. स्मशानभूमी अर्धवट जळालेल्या लाकडावरुन पोलिसांनी तपासाची सुरुवात केली.
आजूबाजूच्या गावांमध्ये तपास केल्यानंतर गुणवरे (ता.फलटण, जि. सातारा) वखारीमधून दादासाहेब हरिहर व विशाल खिलारे यांनी १५ नोव्हेंबर रोजी अंतविधीसाठी लाकडे नेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनी काहीच माहीत नसल्याचा आव आणला होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच जगताप याचा खून केल्याची कबुली दिली. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, बाळासाहेब कारंडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, विक्रम जाधव, अजित थोरात, अभिजित कळसकर, अजित राऊत, अजय घुले, स्वप्निल अहिवळे, नीलेश शिंदे यांनी तपास करून खून प्रकरण उघडकीस आणले.
जगताप यांचा असा केला खून – हरिभाऊ जगताप यांचा खून छेड काढल्याच्या कारणावरून केला. हरिभाऊ जगताप व दादासाहेब हरिहर हे एकमेकांचे ओळखीचे होते. १२ नोव्हेंबर रोजी दादासाहेब हरिहर व त्याची पत्नी हे गंगाखेड येथील जगताप यांच्या घरी गेल्यानंतर जगताप याने हरिहर याच्या पत्नीची छेड काढली होती. याचा राग मनामध्ये धरुन जगताप याला जीवे मारण्याचा कट रचला. १४ नोव्हेंबर रोजी हरिहर याने गोड बोलून जगताप यांना माण तालुक्यातील सतोबाच्या यात्रेसाठी घेऊन आला. गोखळीमध्ये हरिहर यांच्या घरी मुक्काम केल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी यात्रेसाठी तिघेजण सतोबाच्या यात्रेमध्ये रात्री जेवणासाठी गेले. तथपूर्वी हरिहर याने जगताप याला जाळण्याची तयारी करून ठेवली होती. यात्रेमध्ये
जेवणानंतर बारामतीला – सोडण्याचा बहाणा करून तावशी गावातील स्मशानभूमी जवळ नेले. लघुशंकेचा बहाणा करून स्मशानभूमीजवळ थांबल्यानंतर हरिहर व खिलारे याने जगताप याच्या डोक्यामध्ये लाकडाने मारहाण करून खून केला. खुनानंतर जगताप यांचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये जाळून पसार झाले. पोलिसांनी अर्धवट जळालेल्या व शिल्लक करंज झाडाच्या लाकडावरुन तपास करून दोन दिवसांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या.
म्हणून मृतदेह जाळला – पुरलेला मृतदेह शोधता येत असल्यामुळे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी हरिभाऊ जगताप यांचा मृतदेह जाळला असल्याचे दादासाहेब हरिहर यांनी पोलिसांना सांगितले.