खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.’ अधो पोस्ट केली असून एका खासदाराचाच मोबाईल फोन हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात राजकीय नेत्याचे फोन किंवा सोशल मीडिया हँडल हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहेत. आता, सुप्रिया सुळे यांचा तर थेट मोबाईल फोन हॅक झाला आहे. शिवाय, व्हॉट्सअपदेखील हॅक करण्यात आल्याचं कळत आहे.
खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार – आपल्या सोशल अकाऊंटवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी “माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व.
नागरीकांना माझी विनंती आहे की, आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा हि अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घ्यावी.” असे आवाहन नागरिकांना केले आहे.