मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे.
महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकरी सोनवणे यांच्या उसाच्या शेतात रोहित्र असून, त्यास जोडलेल्या मुख्य वीजवाहक तारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठिणग्या पडत होत्या. याबाबत त्यांनी महावितरणकडे तक्रार देखील केली होती. मात्र, योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि ठिणग्यांमुळे ऊस पेटला.
याबाबत शेतकरी अविनाश सोनवणे म्हणाले, की शेतातील रोहित्राच्यावरील बाजूस असणाऱ्या वीजवाहक तारांमध्ये वारंवार घर्षण होत होते. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच आमच्याच उसाचे पीक जळून खाक झाले आहे. नुकसानीस महावितरण कंपनी जबाबदार आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार येथील रोहित्राच्या वरील बाजूस असलेल्या विद्युत वाहक तारांची दुरुस्ती केली जाईल. महावितरण कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी सहकार्य केले जाईल.- इर्शाद शेख, शाखा अभियंता मांडवगण फराटा