पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जर्मन भाषेत देशात प्रथम आलेल्या आदित्य ठोंबरे या विद्यार्थ्याचाही विशेष सत्कार झाला.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जाहीर केल्याप्रमाणे, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ६ आणि २०२४-२५ मधील १५ असे एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या.यासोबतच, विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार्गदर्शक शिक्षक माया लंघे आणि हंबीरराव लंघे यांना त्यांच्या योगदानाबद्दल पल्सर मोटरसायकल आणि सुवर्णपदक देऊन गौरवले. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, संपूर्ण पोशाख आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना फेटे बांधून ट्रॉफी आणि सायकल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पूजा कंद, सरपंच मोनिका कंद, उपसरपंच सुजाता कंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापिका जयश्री अनुसे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ शिंदे यांनी केले, तर आभार मनोज म्हाळसकर यांनी मानले.