पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील जय मल्हार हॉटेलजवळ चव्हाण कुटुंब राहत होते. अक्षय चव्हाण हे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. शुक्रवारी सकाळी सहा ते सात जण कारमधून आले आणि मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकल्याने वाद झाला.यावरून दोघात हाणामारी सुरू झाली.वादानंतर आरोपींनी चव्हाण कुटुंबीयावर दगडफेक केली. इतकच नाही तर आरोपींनी चव्हाण कुटुंबीयांच्या दिशेने गोळीबार देखील केला.
त्यानंतर आरोपी फॉर्च्युनर गाडीतून पळून गेले. ही गोष्ट पोलिसांना समजल्यावर त्यांनी थेऊर केसनंद रोडवर नाकाबंदी करुन तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे व फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे.
या हल्ल्यात शीतल चव्हाण गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण गोळी लागल्यामुळे की दगडफेकीमुळे, याचा तपास सुरु आहे.पोलिसांनी भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे या तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. बुधवारी शितल यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला.