कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी रोजी विवाह करणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली, ग्रामविकास , पोलीस पाटील ,आशा सेविका यांनी विवाहस्थळ गाठले.
दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांनी महिला व बाळ विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत बालविवाह बाबत फॉर्म व माहिती भरुन घेत नवरदेव मुलगा, त्याचे आई वडील, भाऊ, मामा, अल्पवयीन नवरी युवतीसह तिचे आई वडील, चुलते व नातेवाईक यांची नावे लिहून घेत नवरी व नवरदेव यांचे ओळखपत्र घेऊन सदर बालविवाह रोखून पालक व नातेवाईक यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
तसेच अल्पवयीन युवतीचा विवाह करणे म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा असल्याची संपूर्ण माहिती देत अल्पवयीन युवती अठरा वर्षाची पूर्ण होई पर्यंत विवाह न करण्याबाबत समज दिली त्यावेळी सदर अल्पवयीन युवतीच्या पालकांनी विवाह करणार नसल्याचे सांगत त्याप्रमाणे पोलिसांना लेखी स्वरुपात जबाब देखील लिहून दिले आणि त्यानंतर होणारा विवाह हा रद्द झाला असून शिक्रापूर पोलिस तसेच कोरेगाव भीमाचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन युवतीचा बालविवाह रोखला गेला आहे.