सी सी टी व्ही फुटेज मध्ये सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचे सी सी टी व्ही मध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये सिंहसारखा प्राणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत संबधित प्राण्याला पकडण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
कोरेगाव भिमा येथील गव्हाणे वस्ती येथील पोपट गव्हाणे यांच्या घरी लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये १९ डिसेंबरला रात्री २.४५ वाजता एक सिंह सदृश्य प्राणी दिसत असून त्याने कुत्र्याची शिकार केली तसेच तो शिकार केलेल्या जागी चार ते पाच मिनिटे थांबला असून त्यानंतर शिकारीला रानात ओढत नेले. या सिंह सदृश प्राणी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गुजरात येथील गिर अभयारण्यामध्ये सिंह मोठ्या प्रमाणात आढळतात.महाराष्ट्रात शक्यतो सिंह आढळत नाहीत.पण पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर व खेड,जुन्नर व शिरूर तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याने बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आमच्या घरी रात्री पावणे तीनच्या दरम्यान सिंहासारखा दिसणाऱ्या प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्यावर सदर प्राणी अंदाजे चार ते पाच मिनिटे एकाच जागी थांबला होता. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून वनविभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच तातडीने पिंजरा लावण्यात यावा ही विनंती. – शेतकरी पोपट गव्हाणे
कोरेगाव भिमा येथील शेतकऱ्याच्या घरी तातडीने पाहणी करण्यात येणार असून संबधित प्राण्याच्या पायांचे ठसे घेण्यात येणार आहे त्यानंतर सदर प्राणी सिंह आहे की इतर प्राणी आहे याबाबत माहिती देण्यात येईल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. – स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर वनविभाग