ज्यांच्यावर रोष होता, तेच वाचले…निष्पाप मात्र जिवानिशी गेले..
पुणे – हिंजवाडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसलेले होते.दरम्यान, याच आगीच्या घटनेतील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती. खु्द्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडवून आणला होता. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.
आगीची ही घटना १९ मार्च राजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना समोर येताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर पुढच्याच काही तासांत पोलिसांनी या आगीच्या कारणाचा शोध लावला आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरनेच ही आग लावल्याचे समोर आले आहे. हा घापतात घडवून आणण्यासाठी त्याने भल्याभल्यांना थक्क करणारी योजना आखली होती.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घातापाताची संपूर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी सांगितल्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याने या घटनेचा उलगडा केला आहे. जळालेल्या गाडीच्या चालकाचे नाव जनार्दन हंबर्डीकर (वय ५४ वर्षे) असे आहे. त्यानेच घातपात रचून हे कृत्य केले.
चालक हंबर्डेकर याचा कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीत पगार कापला होता. तसेच चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची. हिडीस-फिडीस केले जायचे. या सर्वांमुळे कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांवर त्याचा राग होता. या रागातून बदला घेण्याच्या सुडातून त्याने हे सर्व कटकारस्थान रचले. प्रिटिंग मशीन व शाही साफ करण्याचे बेंझिन सोल्युशन यासह स्फोटक केमिकलची एक लिटरची बाटली चिंध्यांवर ओतून त्याने सीट खाली ठेवले होते. घरातून येताना आणलेल्या आगपेटीच्या मदतीने हा स्फोट घडवून आणण्यात आला. यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? मागचा दरवाजा देखील उघडू नये म्हणून त्यांने काही पूर्व तयारी केली होती का? याबाबत हिंजवडी पोलीस सखोल तपास करीत आहेत.
निष्पाप जीवांचा गेला बळी
दुर्दैवी बाब म्हणजे या जळीत कांडात ज्यांच्यावर चालकाचा रोष होता ते सुदैवाने या दुर्घटनेतून बचावले असून गंभीर भाजले आहेत. मात्र ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता अशा चार निष्पाप जीवांचा नाहक बळी गेला आहे.