शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले.
दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सत्रात झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी भूषवले. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले आणि साहित्यिक प्रा. नामदेवराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी वाघ सर यांनी केले.
या कवी संमेलनात शिक्रापूर येथील भैरवनाथ मोफत वाचनालयाचे ग्रंथपाल, कवी आणि लेखक संतोष दशरथ काळे यांनी त्यांच्या “ग्रंथालय उभारा” या स्वलिखित कवितेसह इतर कविता सादर केल्या. त्यांचा सादरीकरणास उपस्थित मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला.
सन्मानाच्या क्षणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले आणि जिल्हा ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपांग यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संतोष काळे यांचा ग्रंथ भेट देत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी रमेशराव सुतार, सोपानराव पवार, कैलास चौरे, तसेच ग्रंथालय कार्यकर्ते निलेश क्षीरसागर आणि पुणे जिल्ह्यातील इतर ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथोत्सवातील या सन्मानाने कवी संतोष काळे यांचे साहित्यिक योगदान अधोरेखित झाले असून, हा क्षण सर्व साहित्यप्रेमींना प्रेरणादायी ठरला आहे.