मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ क्लिनिक, पेठ येथून मंचरकडे येत असताना काही अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. सफारी गाडीतून उतरून त्यांना मारहाण केली व जबरदस्तीने जंगलात नेले.
तिथे त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरून त्यांनी १५ लाख देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख रुपये वसूल करण्यात आले. शिवाय, डॉक्टरांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला. नंतर संध्याकाळी त्यांना सुरक्षित सोडण्यात आले.
या प्रकरणी योगेश चौधरी, मनोज कडलक, प्रवीण ओव्हाळ (सर्व राहणार खेड), तुषार टेके, आदिनाथ नाईकरे, पवन थोरात (सर्व राहणार मंचर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.