शिक्षक दांपत्याने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन, वर्षभरापूर्वी झाल होत लग्न

Swarajyatimesnews

पुणे – कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित चिराग चंद्रशेखर शेळके( वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी (वय 24) या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

बुधवारी (ता. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व प्रा.पल्लवी हे दुचाकी वरून येथील वारूळवाडी – ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली.या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.

शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली.चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा.पल्लवी यांचा शोध घेता आला नाही.

दरम्यान कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी डिंभे डावा कालव्यातील पाणी कमी केले. आज(ता. 2) सकाळी नऊ वाण्याच्या सुमारास प्रा.पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. आज दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!