शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा

Swarajyatimes news

खेड तालुक्यातील शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. ही घटना रविवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली.दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले. अनिकेत पंडित दौंडकर (वय २५, रा. शेलपिंपळगाव, खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दौंडकर हे भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दौंडकर यांचा शेल-पिंपळगाव येथे बंगला आहे. शनिवारी रात्री दौंडकर हे नेहमीप्रमाणे घरात कुटूंबासह झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजता सहा दरोडेखोर दौंडकर यांच्या घरात शिरले. घरातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून चोरटे पसार होण्याच्या प्रयत्नात होते. याचवेळी दौंडकर हे झोपेतून जागे झाले. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका चोरट्याने दौंडकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. प्रसंगावधान राखत दौंडकर यांनी तो हातावर घेतला. त्यामुळे दौंडकर बचावले. मात्र, त्यांच्या हातासह पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर चोरटे पळून गेले.

दरोडखोरांनी दौंडकर यांच्या घरातून ४२ हजार ५०० किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ हजार ५०० रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दौंडकर यांना उपचारासाठी भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जर्‍हाड तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!