रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून

Swarajyatimesnews

 हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली.

याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या माधुरी निखील पवार ( वय ३३, रा. श्रीनाथ निवास, नंदिनी टकलेनगर, मांजरी बु. ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषार झेंडे (रा. मारी गोल्ड प्लाझा सोसायटी, नंदिनी टकलेनगर, मांजरी बु.) या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी गावात महिला सासू-सासरे आणि पतीसह वास्तव्यास आहे. फिर्यादी महिलेचे पती मगरपट्टा येथी एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. आरोपी झेंडे हा त्यांच्या बंगल्याशेजारील सोसायटीमध्ये राहतो. फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. फिर्यादी माधुरी या शुक्रवारी (दि. १४) त्यांच्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार कॅब त्यांना घेण्यासाठी बंगल्यासमोर आली. रस्त्यामध्ये थांबल्यानंतर महिला आणि तिचे पती असे दोघे मिळून कॅबमध्ये त्यांचे सामान ठेवीत असताना, बंगल्याजवळील सोसायटीमध्ये राहणारा आरोपी तुषार झेंडे हा दुचाकीवरून आला.

त्याने कॅब चालकास तुला गाडी निट लावता येत नाही का, रस्त्यामध्ये गाडी  का लावली अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी माधुरी यांनी दादा आम्ही दोन मिनिटात जात आहोत असे म्हटल्यावर तो तेथून निघाला. पुढे जात गाडीच्या आरशात पाहात बडबड करत होता. त्याचवेळी माधुरी यांच्या पतीने कॅबचालकाला काय बोलणे याची माहिती घेत होते. याचा अंदाज घेत आरोपी झेंडे पुन्हा वळून कॅबजवळ आला. कॅबचालकाला काय विचारतो, असे म्हणून माधुरी यांचे पती आणि झेंडे यांच्यात वाद सुरू झाले. अरेतुरेची भाषा बोलू लागला. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

माधुरी यांच्या पतीने प्रतिकार करताच झेंडेने त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट काढून माधुरी यांच्या पतीच्या डोक्यावर मारले. त्यात मधे आलेल्या माधुरी यांनादेखील मारहाण करण्यात आली. हेल्मेटने त्यांच्या मानेवर उजव्या बाजूस मारहाण केली. हा गोंधळ ऐकून माधुरी यांचे सासू व सासरे खाली आले. त्यांनी मधे पडून सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तुषार झेंडे यांनी हेल्मेटने व लाथाबुक्याने मारहाण करत होते. त्यावेळी माधुरी यांनी झेंडेला ढकलून दिले असता, त्याने जमिनीवरील दगड उचलून त्यांना फेकून मारला. तो दगड त्यांच्या डाव्या डोळ्याला लागल्याने रक्त येऊ लागले. झेंडे याने मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!