वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसभेत वढू बुद्रुक हे महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मृत्यूंजय अमावस्येच्या दिवशी, ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराज वीरगतीला प्राप्त झाले, त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात स्वामी रामगिरी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, अन्य पाच पुरस्कारांचे वितरणही शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शंभूभक्तांची उपस्थिती होती, आणि रक्तदान शिबिरात सुमारे ५,००० पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तथा ३३६ वा बलिदान दिनाचे निमित्ताने आज वढु बुद्रुक येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय महाराज भोसले यांच्या किर्तनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आगमण झाले. त्यांनी यावेळी स्वामी रामगिरी महाराज यांना स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अन्य पाच पुरस्कारही श्री शिंदे यांनी यावेळी वितरीत केले. दरम्यान सकाळपासूनच प्रचंड मोठ्या संख्येने शंभूभक्तांची वढु बुद्रुक येथे मृत्यूंजय अमावस्येच्या निमित्ताने दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार माऊली कटके, केंद्रीय मंत्री मुरली मोहळ, उपसभापती डॉ.निलम गो-हे, स्व.आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, योगेश गावडे-इनामदार आदींचे आगमण झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक तसेच पुरषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत अक्षय महाराज भोसले यांनी किर्तनाबरोबरच वढु बुद्रुक आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाबाबत विस्तृत विवेचन केले. आमदार माऊली कटके यांनी वढु बुद्रुक व तुळापूर ही दोनी पुण्यस्थळे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय पुस्तकात घेण्याची मागणी केली तर संपूर्ण देशाभरातून मोठ्या संख्येने येत असलेल्या शंभूभक्तांसाठी पार्कींग व्यवस्था नियोजन मोठे करण्याबाबत सुचना केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कवीकलश यांच्या कवीतेने भाषणाची सुरवात करुन तमाम हिंदूंसाठी आणि मराठा बांधवांसाठी वढु बुद्रुक हे शक्तीपिठ असल्याने इथे सरकार निधी पडू देणार नसल्याचे सांगितले व महायुती सरकार म्हणून आमच्या काळात संतांच्या केसालाही आम्ही कुणाला हात लावू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी शंभूभक्तांची पायी वारीची पालखी दाखल झाली. अशाच पध्दतीने शंभूपालखीची प्रथा संपूर्ण राज्यभर सुरू झाल्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम महायुती सरकार करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी गावचे वतीने माजी सरपंच अंकुश शिवले तर स्मृती समितीचे वतीने सोमनाथ भंडारे यांनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाला सरपंच माऊली भंडारे, उपसरपंच रेखा सोनेश शिवले, समितीचे संस्थापक मिलींद एकबोटे, सोमनाथ भंडारे, माजी सरपंच अंजली शिवले, सारीका शिवले, पोलिस पाटील जयसिंग भंडारे व गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच वाजेपर्यंत ५ हजार पिशवी रक्त संकलन झाल्याची पर्यायाने रक्त संकलनाचा पुराचा अनुभव आल्याची माहिती धर्मवीर संभाजीराजे युवा मंच समितीचे वतीने सांगण्यात आले.
पुरस्कार प्रदान – यावर्षी मुख्य स्वराजरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार स्वामी रामगिरी महाराज (सरला बेटाचे मठाधिपती, अहिल्यानगर) यांना तर शंभूतेज पुरस्कार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना. शंभूसेवा पुरस्कार सुधीर बाळसराफ, महेश भूईखार व भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना यावेळी देण्यात आला. या शिवाय खास छावा पुरस्कार छावा चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण उत्तेकर व त्यांच्या टिमला तर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे निर्माते तुषार शेलार यांना देण्यात आला. वीर बापूजी शिवले स्मारक मंडळ पुरस्कार वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांना प्रदान करण्यात आला.