चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार चालक रामेश्वर गणपत सांगवे (वय २३) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिकअप चालक सचिन मुरलीधर गोरे (वय २९, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर सांगवे हे त्यांची कार घेऊन मुंबईकडे जात असताना, चाकण येथील रसिका हॉटेलसमोर पिकअप जीपने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील हर्षदा, चालक रामेश्वर सांगवे आणि हर्षदा यांच्या सासू गंभीर जखमी झाले. हर्षदा यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चाकण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.