राजाराम गायकवाड
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होते.”
स्पर्धेतील विजेते आणि निवड – या स्पर्धांमध्ये एकूण ५८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध शाळांतील बालकलाकारांचा समावेश आहे.गट क्र. ४ (इयत्ता ८ वी ते १० वी) आणि गट क्र. ३ (इयत्ता ५ वी ते ७ वी) मधील एकूण ३६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.गट क्र. १ आणि २ (इयत्ता १ ली ते ४ थी) मधून १२ विद्यार्थ्यांची निवड झाली.या व्यतिरिक्त, उत्तेजनार्थ म्हणून आणखी ३९ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. यामध्ये मनोज डाळींबकर, अरुण पटवर्धन, प्रीती केसकर, संतोष रासने, मंजुषा जोशी, पंकज चव्हाण, प्रेम सूर्यवंशी, स्वप्नील खंबायत, मयुरी भोंडे आणि संपदा देवधर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमाला श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप आणि बालरंगभूमी पुणे परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी केले, तर आभार प्राचार्य रामदास थिटे यांनी मानले.