“संघर्षाशिवाय यश मिळत नाही; कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी” – महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके
लोणीकंद – दि. १० नोव्हेंबर : “संघर्षाशिवाय यश मिळत नाही. कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी.” असे प्रेरणादायी मार्गदर्शन महाराष्ट्र केदार अभिजीत कटके यांनी लोणीकंद येथील होलि स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, वार्षिक क्रीडा सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या बँडसेटच्या तालावर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आकर्षक मिरवणुकीने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून वार्षिक क्रीडा सोहळ्याची औपचारिक सुरुवात केली.याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या वेलकम डान्स आणि एरोबिक डान्स यांसारख्या सादरीकरणांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी वातावरणात उत्साह संचारला.
विद्यार्थ्यांनी यावेळी क्रीडा शपथ घेत प्रामाणिकपणा, शिस्त आणि संघभावना जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्याने उभारलेल्या व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
या क्रीडा सोहळ्याच्या यशात क्रीडा शिक्षकांसह सर्व शिक्षकांचा सक्रिय सहभाग लक्षणीय राहिला. संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिली आणि सिस्टर मारिया टेरेस यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्धपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या रनिंग रेस फायनल स्पर्धांनी क्रीडा उत्सवाचा परमोच्च क्षण अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साह आणि जोशाने सहभाग नोंदवत मैदान उत्साहाने गजबजून गेले.
