राजकारणात नाही तर समाजकारणात रस
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा करत शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा केली आहे.(Breaking News: Prakash Dhariwal’s announcement not to contest the election causes an earthquake in Shirur politics!)
“मला राजकारणात नाही तर समाजकारणात रस आहे,” असे सांगत धारिवाल यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. लोकशाही क्रांती आघाडीनेही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शहर विकास आघाडीनेही माघार घेतल्याने शिरूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता नगरपालिकेत कायम होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज धारिवाल यांच्या ‘आशीर्वाद’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी औपचारिक घोषणा केली.
धारिवाल म्हणाले, “वडील रसिकलाल धारिवाल यांच्या निधनानंतर माझ्या खांद्यावर व्यवसायाची सर्व जबाबदारी आली आहे. व्यवसाय आता सातपेक्षा अधिक राज्यांमध्ये विस्तारला असून, त्या कारणामुळे मी राजकारणासाठी वेळ देऊ शकत नाही. मी कोणत्याही पक्षात नाही; मात्र सर्व पक्षातील नेत्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहेत.”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात नव्हे, समाजकारणात माझा कायम रस राहील. अर्धवट माहितीवर विरोध नको, शंका असल्यास प्रत्यक्ष भेटून निरसन करावे. वडील नसल्याने मी एकटाच आहे, पण समाजकारणाची ओढ कायम आहे. मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत.”
चिरंजीव आदित्य यांना सध्या राजकारणात आणणार नाही – धारिवाल यांनी स्पष्ट केले की, “चिरंजीव आदित्य यांना सध्या राजकारणात आणणार नाही. याबाबतचा निर्णय तो स्वतः घेईल. मात्र, आम्ही दोघेही समाजकारण आणि शिरूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.”
शिरूरचा सर्वांगीण विकास हेच माझे खरे ध्येय आहे – पालिकेत काम करताना सर्व पक्षीय नगरसेवक आणि अपक्ष सदस्यांनी सहकार्य केल्याचे सांगून धारिवाल म्हणाले, “मी कधीच भेदभाव केला नाही. विरोधकांचीही कामे प्रामाणिकपणे केली. शिरूरचा सर्वांगीण विकास हेच माझे खरे ध्येय आहे.”
या घोषणेनंतर शिरूर नगरपालिकेच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
