हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन

Searajyatimesnews

कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा व परिसरातील अनेकांसाठी आधारवड होत्या. त्यांच्या जाण्याने गावातील वयोवृद्ध कुटुंबप्रमुख गमावल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.

हॉटेल गणेश भुवनची सेवेची परंपरा – पंचेचाळीस वर्षांपूर्वी पती कै. गोपीनाथ (नाना) यांच्यासह सुरू केलेल्या छोट्याशा हॉटेल व्यवसायाला द्वारकाबाईंच्या जिव्हाळ्याच्या स्वयंपाकामुळे अनोखा नावलौकिक मिळाला.चविष्ट लाल मिसळ, दर्जेदार फरसाण, चटकदार मटकी-भेळ यांच्या स्वादाने, चवदार चहा यामुळेहॉटेल  गणेश भुवनने ग्राहकांची मने जिंकली.अल्पावधीतच सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, ट्रक चालकांपासून मंत्री-खासदारांपर्यंत सर्वांच्या पसंतीचे ठिकाण ठरले.“मिसळीबरोबर किती पाव खाल्ले” याच्या स्पर्धा इथे होत, आणि नाना-नाणी आग्रहाने पोटभर जेवण घालायचे. तृप्तीचा ढेकर ऐकणे हेच त्यांच्यासाठी खरी आनंदाची गोष्ट होती.व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या जोडप्याने उभा केलेला हा व्यवसाय आज वटवृक्षासारखा विस्तारला आहे. त्यांच्या मुलांनी व नातवंडांनी मेडिकल, शिक्षण, उद्योग, समाजकारण व राजकारण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

गणेश भुवन हे केवळ हॉटेल नाही, तर आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व मैत्रीचे केंद्र बनले आहे. आजही कोणाला भेटायचे असल्यास अजूनही लोक सहज म्हणतात “चल, गणेश भुवनला भेटूया!” या भेटीच्या केंद्रस्थानी हॉटेल असण्याचे मुख्य कारण हे नाणींचे हसतमुख व्यक्तिमत्त्व होते.

कै.द्वारकाबाई उर्फ नाणी याच्या पश्चात तीन मुले हॉटेल गणेश भुवनचे मालक व माजी चेअरमन महादेव फडतरे, वायरमन आनंदराव फडतरे,माजी ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास फडतरे,  माजी ग्राम पंचायत सदस्य कुंदा फडतरे यांच्या सासू मुली भीमाबाई ढमढेरे, भीमाबाई जमादार, विमल ताडगे, रेखा गायकवाड,नातू उद्योजक नितीन फडतरे, प्रा.डॉ .तुषार फडतरे, उद्योजक निखिल फडतरे ,अक्षय फडतरे, बापूसाहेब फडतरे , सुरेश फडतरे, कीर्तनकार विद्या ढमढेरे यांच्या आजे-सासू , तसेच नातवंडे, पतवंडे,जावई आणि मोठा आप्तस्वकीय परिवार असून द्वारकाबाई यांच्या निधनाने कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील जनजीवनातील मायेचा,प्रेमाचा व आपुलकीचा एक सुवासिक अध्याय संपला आहे. त्यांच्या चवदार हाताची जादू व आपुलकीची परंपरा कायम स्मरणात राहतील. 

  कै. द्वारकाबाई उर्फ नाणींचा दशक्रिया विधी कोरेगाव भीमा नदीकिनारी शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता होणार असून ह.भ.प.कबीर महाराज अत्तार यांचे प्रवचन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!