भोसरीहून बीडकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर वाघोली येथील बकोरी फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. चार दरोडेखोरांनी चालक, वाहक आणि एका प्रवाशाला मारहाण करून रोख रक्कम लुटली. ही धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजता पुणे-अहमदनगर रस्त्यावरील समृद्धी लॉजिंगसमोर घडली.
या प्रकरणी बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयुर नायगाव, ता. पाटोदा जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अज्ञात दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.युवराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज भोसले यांच्या मालकीची बस घेऊन फिर्यादी भाऊसाहेब मिसाळ गुरुवारी रात्री ८ वाजता भोसरीहून बीडकडे निघाले होते. वाटेत प्रवासी घेण्यासाठी ते रात्री पावणेबारा वाजता बकोरी फाटा येथील समृद्धी लॉजिंगसमोर थांबले. त्याच वेळी तीन अज्ञात व्यक्ती बसमध्ये घुसले.
त्यापैकी एकाने लगेच बॉनेटजवळ बसलेल्या ऋषिकेश सानप (वय २४, रा. बीड) या प्रवाशाला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि पैसे मागितले. त्यानंतर दुसऱ्या दरोडेखोराने चालक भाऊसाहेब मिसाळ यांना मारहाण करत त्यांच्या शर्टच्या खिशातून ५ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी तिसऱ्याने बस कंडक्टर संतोष ठोकळ (वय ३३, रा. बीड) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २ हजार १२२ रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
लुबाडणूक केल्यानंतर तिघेही बसमधून खाली उतरले. बाजूलाच उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारमध्ये बसून ते अहमदनगरच्या दिशेने पळून गेले.चालक आणि वाहकांनी दिलेल्या माहितीनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्यावेळी आजूबाजूला बरीच गर्दी होती, त्यामुळे यामागे काही जुना वाद असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.