शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कवठे यमाई येथील मळगंगा क्लासेससमोर होता. त्यावेळी त्याने अभिषेक बाळासाहेब कांदळकर याला “तू रात्री आमच्या गाडीला कट का मारला?” असे विचारले. यावर संतापलेल्या अभिषेकने, “रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, मी कशीही गाडी चालवीन” असे बोलून शिवमला शिवीगाळ केली.
या शाब्दिक वादानंतर अभिषेकने शिवमच्या पोटात व छातीत लाथा मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याने खिशातून लोखंडी फायटर काढून शिवरच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून त्याला गंभीर दुखापत केली. शिवमने पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिल्यावर, अभिषेकने “तू जर माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर शिवमने तात्काळ शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत अभिषेकविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.