कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

Swarajyatimesnews

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं. त्या निःशब्द नात्याची, त्याच्या प्रेमाची आणि विरहाची ही कहाणी, प्रत्येक माणसाच्या मनाला स्पर्श करून जाते.”

 एका शांत कोपऱ्यात काही दिवसांपासून एक कुटुंबासारखी वाटणारी माकडांची जोडी सर्वांच्या नजरेत भरली होती. एक माकडीण, तिचं लहानगं पिल्लू आणि त्यांच्यासोबत कायम सावलीसारखं वावरणारा एक साथीदार. त्या माकडीणीच्या डोळ्यांत आपल्या पिल्लासाठीची अथांग माया आणि त्या साथीदाराच्या चेहऱ्यावरची मूक काळजी… हे दृश्य पाहून अनेकांना आपल्याच घरातल्या मायेच्या नात्याची आठवण झाली होती.

पिल्लू नुकतंच इकडून तिकडे उड्या मारायला लागलं होतं. माकडीण त्याला कधी धावत पकडायची, कधी पाठीवरून घेऊन फिरायची, तर कधी त्याच्याशी खेळता खेळता त्याला सुरक्षित ठेवायची. आणि तो, त्यांचा साथीदार, कायम एक सुरक्षित वर्तुळ त्यांच्याभोवती निर्माण करून उभा राहायचा. त्यांची ती निष्पाप दुनिया सुरू होती, जिथे फक्त प्रेम, काळजी आणि सुरक्षितता होती.

पण, नियतीला त्यांचा हा आनंद फार काळ पाहवला नाही. पिल्लाचा तो काळ आला… काळजाला चिरणारा. पिल्लू खेळत असताना अचानक विजेच्या एका उघड्या तारेला स्पर्श झाला. एका क्षणात ते निष्पाप कोवळ निरागस हुंदडणार पिल्लू गतप्राण झालं, त्याचा निष्प्राण देह जमिनीवर पडला. हे पाहून माकडीण वेड्यासारखी धावली. आपल्या पिल्लाला  वाचवण्यासाठी तिने जीव ओतून प्रयत्न केले, पण त्याच प्रयत्नांत ती देखील त्या जीवघेण्या तारांमध्ये अडकली… आणि तिनेही अखेरचा श्वास घेतला मायलेकांचे निष्प्राण, निश्चल देह गलितगात्र होऊन जमिनीवर पडले होते.  पावसाच्या सुखद  वातावरणात अचानक एक भयाण शांतता, धीरगंभीरता पसरली.जीवघेणी दुःखाची काळी कुट्ट सावली त्या माकडाच्या कुटुंबावर पडली होती.

हसत खेळत कुटुंब उध्वस्त झालं होत… पण त्याहीपेक्षा हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं, त्यांच्या बाजूला निःशब्द बसलेलं ते तिसरं माकड. त्याच्या डोळ्यात न अश्रू, ना कसला संताप, ना आक्रोश फक्त निःशब्द एका जागी स्तब्ध..ते न हलतंय, न काही खातंय, न कुणाकडे पाहतंय… फक्त आपल्या डोळ्यात साचलेल्या अथांग वेदनेने, शून्यात हरवून गेलंय. आपल्या सोबतीणीला आणि पिल्लाला शांत पाहतंय..त्याच्या मनात कालवाकालव सुरू असूनही दुःखाच्या सागरात ते आपल हरवून गेलाय… शांत,स्तब्ध… मृत्यू त्यांचा झालाय पण निष्प्राण हा दिसतोय.. तसाच किती वेळ तो तसाच बसला , तो तिथून हलला नाही. जणू काही अखेरच्या श्वासापर्यंत दिलेले सोबतीच्या वाचनाचे मुक पालन करत तिथेच थांबलेला, जणू काही त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की, त्याचे दोन जीव आता कधीच परत येणार नाहीत. त्याच्या डोळ्यात आपल्या सोबत्यांसाठीची ती निष्ठा आणि पिल्लासाठीची ती अस्फुट वेदना स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे कोरडे असले तरी, त्याच्या मनात अश्रूंचा महासागर उसळला असावा.

या दुर्घटनेबाबत कळताच कोरेगांव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना माहिती दिल्यानंतर वनपाल बबन दहातोंडे, वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, गणेश टिळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृत माकडांना ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पशुवैद्यकीय कार्यालयात नेले, दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी मृत माकडांचे शवविच्छेदन करत वन विभागाच्या वतीने त्यांचे दफन करण्यात आल्याची माहिती वनरक्षक बबन दहातोंडे यांनी दिली. तर अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये खेळणारे आणि फिरणारे लहान मुलांचे आकर्षण ठरणारे माकड व त्यांचे पिल्लू मेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

कदाचित तो अजूनही थांबलेला आहे… आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी.,आपल्याला आठवण करून देण्यासाठी – की नातं फक्त बोलण्याने जपता येत नाही, तर ते प्रत्येक श्वासात अनुभवायचं असतं., की प्रेमाचं मौन, आरडाओरडांपेक्षा अधिक स्पष्ट आणि बोलकं असतं, माणूस असणं म्हणजे कधीकधी, मुक्यांच्या वेदनांकडेही सहृदयतेने लक्ष देणं असतं.

ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला आहे…आपल्यातल्या हरवलेल्या माणुसकीला पुन्हा जागवण्यासाठी…आपल्यातलं प्रेम माणुसकी जागवण्यासाठी…त्या माकडाच्या डोळ्यांत, त्याच्या निष्प्राण थांबलेल्या शरीरात, एक आवाज आहे – तो शब्दांमध्ये नाही, पण मनात खोलवर उतरतो. तो आवाज आहे शुद्ध प्रेमाचा, अटूट निष्ठेचा आणि अखंड त्यागाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!