लाल माती गहिरवली… कुस्ती क्षेत्रावर शोककळा….
मुळशी तालुक्यातील माण गावचा भूमिपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी मल्ल विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचे बुधवारी (ता. ४) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने माण गाव, मुळशी तालुका आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विक्रम यांचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होते. घरात लग्नाच्या तयारीचा माहोल असताना या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पै.विक्रम यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान क्षेत्रावर शोककळा पसरली असून रांगडी लाल माती गहीवरली आहे.
विक्रम पारखी सकाळी नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर तातडीने थेरगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विक्रम पारखी यांनी २०१४ साली वारजे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यांनी मुळशीतील माले केसरी गदाही जिंकत आपल्या गावाचे आणि मुळशी तालुक्याचे नाव उंचावले होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांनी पदकं मिळवून आपली ओळख निर्माण केली होती. झारखंड येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ब्राँझ पदक मिळवले होते. त्यांच्या कुस्तीतील पराक्रमांमुळे ते युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरले होते.
विक्रम पारखी यांचे वडील शिवाजीराव पारखी हे माजी सैनिक असून १९९९ च्या कारगिल युद्धात सहभागी झाले होते. कुटुंबात आई, विवाहित भाऊ, बहीण आणि इतर नातेवाईक आहेत. मोठे बंधू पै. बाबासाहेब पारखी हे स्थानिक युवा नेते व उद्योजक आहेत. विक्रम यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.