सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने आणि भक्तिभावाने मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गणेशमूर्तीतील डोळ्यांची उघडझाप, श्री गणेशाच्या हालचालीही जिवंत केल्याने पाहणाऱ्यांना “जणू साक्षात श्री गणेश अवतरले” असा भास झाला. भक्ती, कला आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम या कलाकृतीतून प्रत्ययास आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची संघभावना, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झाला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सादर केलेली ही कला केवळ गणेशभक्तीचे प्रतीक आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत असणारी शाळा असून 1900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2018 ला 624 पटसंख्या असणारी शाळा पंचक्रोशीतील जात विद्यार्थी पट असणारी शाळा ठरत असून मुख्याध्यापक संतोष गोसावी ,ग्रामपंचायत सणसवाडी व ग्रामस्थ शाळेच्या विकासासाठी काम करत आहेत.
शिक्षणाबरोबर कला आणि संस्कारांची जोड मिळाल्यास विद्यार्थी आपल्या कलागुणांना उत्कृष्टपणे सादर करू शकतात.या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी यामध्ये महत्त्वाचे सहकार्य केले.