हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर
वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरील वाघोलीतील कटके वाडी परिसरात घडली. परमेश्वर देवराये (वय ३६, रा. नांदेड) असे मृतक चालकाचे नाव आहे, तर राम दत्ता पुरी (वय २५, सध्या रा. राजगाव, ता. शिरूर, मूळ रा. सावळेश्वर, ता. कंधार, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही चालक एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. हॉटेलच्या बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात परमेश्वर देवराये यांनी राम दत्ता पुरी याला चापट मारली. या अपमानाचा राग मनात धरून राम पुरीने क्रूर निर्णय घेतला. हॉटेलबाहेर येताच आरोपी राम पुरी याने त्याच्या ताब्यातील कंटेनर एम एच १२ डब्ल्यू एक्स ८३०७ वेग वाढवून परमेश्वर याच्या दिशेने नेला आणि थेट त्याच्यावर घातला. या भीषण अपघातात परमेश्वरचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी राम पुरीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.