सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण अपघातांचे सत्र कायम
वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा या भागातील अपघातांच्या सत्राला वाचा फोडली आहे. आरएमसी मिक्सर ट्रकने (काँक्रीट मिक्सर) स्कूल बसला धडक दिली, ज्यामध्ये शाळकरी मुलांचे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र अपघाताची भीषणता पाहता पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळच्या शाळेच्या वेळेत वाघोली-लोहगाव रस्त्यावर बसमधील शाळकरी मुले शाळेकडे जात असताना, अल्ट्रा टेक सिमेंट प्लांटजवळील एका वळणावर मिक्सर ट्रकने बसला धडक दिली. सुदैवाने स्कूल शालेय बसमधील विद्यार्थ्यांना मोठी दुखापत अथवा गंभीर इजा न झाल्याने दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पालकांमध्ये भीती आणि संताप – बस अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पालकांच्या मनात थरकाप उडाला. त्याचबरोबर शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारीच पुणे-नगर रोडवर ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
अवजड वाहनांच्या बेफिकिरीचा त्रास – वाघोली-लोहगाव रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. या वाहनांचे चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होत नाही, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
ट्रॅफिक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह – पोलिस, अग्निशामक विभागांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असतात, मात्र ट्रॅफिक विभागाचा संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने ट्रॅफिक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करणे तसेच नागरिकांना तक्रार नोंदविणे कठीण होते. या अपघातानंतर नागरिकांकडून ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमित संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवजड वाहनांवरील कारवाई आणि नियमित तपासणीच्या अभावी अशा घटना वारंवार घडत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.