पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा येथे बुधवारी (ता. 21) पहाटे एका अनोळखी माळकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत बँक ऑफ बडोदा समोर घडली. मृत व्यक्ती लोणी काळभोर परिसरात नागरिकांकडून भिक्षा मागत असल्याचे सांगण्यात येते.घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस दाखल झाले. त्यांनी जखमीला रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी मृताच्या जवळील पिशवीत सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन सापडला आहे. मोबाईलमध्ये 2024 साली शेवटचा कॉल झाल्याचे दिसते.सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 55 ते 60 वर्षे आहे. रंग काळा सावळा, चेहऱ्यावर दाढी-मिशा, उंची साडे पाच फूट असून गळ्यात तुळशीची माळ आहे.कोणाला या वर्णनाची माहिती असल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या 020-2999 5260 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.