भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी पै. किरण साकोरे मैदानात; पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात विकासाचे रणशिंग फुंकले!
लोणीकंद (हवेली): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून पै. किरण संपत साकोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. केवळ उमेदवारी अर्ज नव्हे, तर हा या भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा ‘संकल्प’ असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
प्रशासकीय शिस्त आणि जनशक्तीचा संगम – मंगळवारी (दि. २१) निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे अर्ज सुपूर्द करताना जनशक्तीचा महासागर लोटला होता. भाजपचे खंबीर नेतृत्व, पुणे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. साकोरे यांच्यासोबतच पंचायत समितीसाठी मोनिका श्रीकांत कंद (लोणीकंद गण) आणि राणी दत्तात्रय वाळके (पेरणे गण) यांनीही अर्ज दाखल करून विजयाचा निर्धार व्यक्त केला.
विकासाचा ‘साकोरे पॅटर्न’: केवळ आश्वासन नाही, तर कृती! – पै. किरण साकोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना घेऊन ते मैदानात उतरले आहेत.
- युवा सक्षमीकरण: तरुणांना रोजगाराच्या संधी आणि क्रीडा सोयीसुविधांचे जाळे विणणे.
- पाणी व पायाभूत सुविधा: वाढत्या शहरीकरणानुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि आधुनिक ड्रेनेज व्यवस्था.
- महिला सुरक्षा व शिक्षण: ग्रामीण भागातील मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या संधी आणि महिला बचत गटांचे सक्षमीकरण.
यावेळी पूजा प्रदीप कंद, पै. संदीप आप्पा भोंडवे, रवींद्र नारायण कंद, मंदाकिनी साकोरे, सुनील वागस्कर यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने साकोरे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, पेरणे-लोणीकंद गटात भाजप प्रभावी ठरत आहे.
