बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता
सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले.
सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम एकत्रित घेण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी गावातील सर्व विद्यार्थी सकाळी ८ वाजता नरेश्वर टेकडीवर जमले. यावेळी स्कॉलरशीप मार्गदर्शक शिक्षकांनी स्पर्धा परीक्षाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नरेश्वर विद्यालयातील शिक्षक चमूने बदललेली सभोवतालची सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे अभ्यास सातत्य याबद्दलचे संस्कारधडे यावेळी दिले. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करीत कार्यक्रम रंजक बनवला.

यावेळी सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र,दरेकर, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, तनुजा दरेकर,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, तानाजी दरेकर,बाळासाहेब सैद, गोविंद मोरे, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी ५०० झाडांचे वृक्षारोपन करून वनभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विविधतेतील राष्ट्रीय एकता आणि एकात्मता जपणारा शाळा – मोठ्या प्रमाणात झालेल्या औद्योगीकरणामुळे विविध प्रांतातील बहुभाषिक, विविध सांस्कृतिक व जीवन पद्धतीतील कामगारांची मोठ्या संख्येने कुटुंबे येथे निवासासाठी आहेत. पर्यायायाने परजिल्ह्यासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आदी राज्यांतील हिंदीभाषक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २४०० एवढी आहे. संस्कारशाळेच्या उपक्रमात सर्व कार्यक्रम मराठीत आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे असतानाही या बहुभाषिक विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग कुतूहलाचा व कौतुकास्पद असल्याचे उपसरपंच राजेंद्र दरेकर यांनी सांगितले.