आरएसएस ने साधला पर्यावरण संवर्धन, श्रद्धा आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती पाणी ओसरल्याने उघड्या पडल्या होत्या. अशा ५०० हून अधिक श्री गणेशाच्या मूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्रित करून मोठ्या भक्तिभावाने व आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित करत सामाजिक बांधिलकीचे आणि धार्मिक कृतज्ञतेचे अनोखे दर्शन घडवले.
गेल्या पाच दिवसांत दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत संघाने नदीकिनारी अविरत कष्ट घेत मूर्ती, निर्माल्य व डेकोरेशनचे साहित्य एकत्रित केले. त्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तींचे योग्य विधीपूर्वक खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले. या कार्यात स्वयंसेवकांसोबत अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संघाच्या या उपक्रमामुळे धार्मिक परंपरा जपली गेलीच, शिवाय नदी परिसराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्याचे कार्यही साधले गेले. पर्यावरण संवर्धन, श्रद्धा आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम घडवून आणणाऱ्या या कार्याचे कोरेगाव भीमा पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. स्वयंसेवकांचा हा सेवाभाव व समाजकारणासाठीची निष्ठा खऱ्या अर्थाने गौरवास्पद मानली जात आहे.