शंभूराजांच्या शौर्याला रक्तदानाची मानवंदना! वढू बुद्रुकमध्ये ५२७१ शंभूभक्तांचे विक्रमी रक्तदान

Swarajyatimesnews

धारकऱ्यांची अनोखी शौर्य, त्याग आणि समाजसेवा

वढू बुद्रुक (ता.शिरूर) भीमा नदीच्या शांत तीरावर उभे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ… वातावरणात दाटलेली गंभीरता… आणि हजारो शंभूभक्तांच्या शिरांमधून वाहणारे रक्त समाजकार्यासाठी अर्पण करण्याची जाज्वल्य तयारी! धर्मवीरांच्या ३३७ व्या बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथे पार पडलेला ‘रक्तदान महायज्ञ’ यंदा अक्षरशः इतिहास घडवून गेला. तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शंभूराजांना अनोखी मानवंदना दिली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला. “ज्यांनी स्वराज्य, धर्म आणि राष्ट्रासाठी रक्ताचा शेवटचा थेंब सांडला, त्यांच्या स्मृतींना रक्तदानरुपी सेवाभावी आदरांजली,” अशा भावना उपस्थित शंभुभक्त व धारकऱ्यांनी व्यक्त केल्या.

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने २०२१ साली रक्तदान महायज्ञाची सुरुवात झाली व त्या वर्षी ३७२ , २०२२ साली १०५६, २०२३ साली २१४२,  २०२४ साली ३०२० २०२५ साली ५५८९ रक्तदात्यांनी तर यावर्षी २०२६ च्या ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान करत शंभूराजांप्रती असलेल्या श्रद्धेचे आणि समाजकार्यातील सक्रियतेचे प्रतीक ठरत आहे. यंदा एकाच वेळी सुमारे ४०० बेडची व्यवस्था करून शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन पार पडले.

पुणे सर्जिकल इन्स्टिट्युट, तर्पण ब्लड सेंटर, अक्षय ब्लड बँक आणि चाकण ब्लड बँक यांच्या सहकार्याने हा महायज्ञ यशस्वी झाला. प्रत्येक रक्तदात्याला शंभूप्रतिमा, ‘मृत्युंजय अमावस्या’ हे पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बलिदान मासाचे व्रत : आचरणातून स्मरण : फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला भीमा नदीकाठी मुंडण करून आणि नतमस्तक होत शेकडो धारकऱ्यांनी बलिदान माzसाची शिस्तबद्ध सुरुवात केली. महिनाभर चप्पल न घालणे, चहा व गोडधोड वर्ज्य करणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे आणि समाधीस्थळी नियमित श्लोक पठण करणे—या कठोर आचारसंहितेतून धर्मवीरांच्या त्यागाचे स्मरण केले जाते.

वढू बुद्रुक येथे यंदा घडलेले दृश्य केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नव्हते; ते समाजसेवेचे सशक्त रूप होते. हजारो तरुणांच्या सहभागातून ‘शौर्याची परंपरा’ आणि ‘समाजासाठीची जबाबदारी’ यांचा संगम दिसून आला.

धर्मवीरांच्या बलिदानाला दिलेली ही रक्तदानाची  मानवंदना केवळ प्रतीकात्मक नाही; ती समाजातील गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणारी आहे. शंभूराजांच्या समाधीपुढे वाहिलेल्या या रक्तदानाच्या थेंबांनी बलिदान मासाचा प्रारंभ अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!