रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला.
ॲड. प्रिया कोठारी यांनी आपल्या वकिलीच्या व्यवसायातील अनेक प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन समस्येची तीव्रता आणि त्याचे परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. “पालक आणि मुलांमध्ये संवाद असेल तरच चांगल्या विचारांची पिढी निर्माण होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील थोरात सर होते. त्यांनी आपल्या भाषणात मुलांची मानसिकता उत्तम ठेवण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कायद्याचे योग्य ज्ञान असण्याची किती गरज आहे, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य कविता खेडकर, जिल्हा ग्रंथालय संघाच्या नारायणी फंड, ग्रामपंचायत सदस्य अर्चना शिंदे, माजी उपमुख्याध्यापक दत्तात्रय भुजबळ सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पडवळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा रणदिवे मॅडम यांनी केले, तर पर्यवेक्षक सुभाष पाचकर सरांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोईफोडे सरांनी केले. या समुपदेशन कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.