पुणे: कोंढवा भागातील एका पॉश सोसायटीत बुधवारी (२ जुलै २०२५) संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना घडली आहे. कुरिअर बॉय बनून सोसायटीत शिरलेल्या एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेसोबत सेल्फी काढून ‘मी परत येईन’ अशी धमकीही दिली. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातील एका पॉश सोसायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीसोबत हा क्रूर प्रकार घडला. पीडित तरुणी घरात एकटीच होती, कारण तिचा भाऊ गावी गेला होता. याच संधीचा फायदा घेत, आरोपीने संध्याकाळी ७:३० वाजता कुरिअर बॉय असल्याची बतावणी करत सोसायटीत प्रवेश केला. तो पीडितेच्या घरी पोहोचला आणि तिला कुरिअर आल्याचे सांगितले. हे माझे कुरिअर नाही असे तरुणीने सांगितल्यावरही, आरोपीने तिला त्यावर सही करावीच लागेल असे सांगितले.
पीडितेने सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तिला काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला आणि तिथून पळून गेला.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीचा मोबाईल घेतला. त्याने तिच्या पाठीवर झोपून एक सेल्फी काढला आणि त्याच मोबाईलमध्ये ‘मी परत येईन’ असा मेसेज टाइप केला. एवढेच नाही तर, या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. आरोपीचे हे कारनामे ऐकून सामान्य नागरिकांसह पोलीसही हादरले आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ५ आणि स्थानिक पोलिसांची ५ अशी एकूण १० पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
आरोपी कुरिअर बॉय बनून आला होता, त्यामुळे तो नेमका कोण होता आणि त्याला पीडितेबद्दल माहिती कशी मिळाली याचा तपास पोलीस करत आहेत. सोसायटीतील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीची ओळख पटवण्यासाठी त्याची तपासणी सुरू आहे. या घृणास्पद गुन्ह्यामुळे पुणेकर हादरले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.