पुणे, दि. २८ ऑगस्ट पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांनी मिळून देशी-विदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेश दर्शन सहल’ आयोजित केली आहे. या सहलीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत १ सप्टेंबर रोजी ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी खास सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीत त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेता येईल.
या सहलीसाठी १ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:३० या वेळेत कात्रज डेपो, हडपसर, कोथरूड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) आणि येरवडा (गुंजन टॉकीज) येथून ५ वातानुकूलित बस उपलब्ध असतील. प्रत्येक बसमध्ये ३५ प्रवाशांची सोय असेल.
या सहलीत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाद्वारे मार्गदर्शक, अल्पोपहार, पाणी आणि प्रथमोपचार पेटीसह आरोग्य सेवक उपलब्ध करून दिले जातील.
सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी गणेश बेंद्रे यांच्याशी (संपर्क क्रमांक ९७३०९९३२८२) संपर्क साधावा किंवा https://forms.gle/BbE36QZDyasCGH2SA या गुगल फॉर्मवर नावनोंदणी करावी, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.