पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल सपकाळ तिच्या पहिल्या पतीपासून वेगळी राहत असून तिला पाच वर्षांचा एक मुलगा आहे. सध्या ती ओंकार सपकाळसोबत राहत होती. २५ जून २०२५ रोजी मीनलला मुलगी झाली. बाळ जन्माला आल्यानंतर साहिल बागवान, रेश्मा पानसरे आणि सचिन अवताडे या मध्यस्थांनी मीनलशी संपर्क साधला. त्यांनी ४० दिवसांच्या मुलीला दीपाली फटांगरे यांना देण्यासाठी ३.५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. मध्यस्थांनी सपकाळ दाम्पत्याला सुरुवातीला २ लाख रुपये दिले. मात्र, मध्यस्थांनी दीपालीकडून जास्त रक्कम घेतल्याचा संशय आल्याने सपकाळ दाम्पत्यामध्ये वाद झाला.
या वादानंतर, ओंकार सपकाळ येरवडा पोलीस ठाण्यात गेले आणि “आमची मुलगी पळवून नेली” अशी खोटी तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या माहितीच्या आधारे मध्यस्थ आणि मुलीला विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, सपकाळ दाम्पत्याने मध्यस्थांमार्फत मुलीची दीपालीला ३.५ लाख रुपयांना विक्री केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
पोलिसांनी सपकाळ दाम्पत्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सुरुवातीला मुलीचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली असली तरी, चौकशीत पैशांसाठी मुलीची विक्री झाल्याचे उघड झाले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.