एक हात निसर्गासाठी! अपंगत्वावर मात करत समर्थने डिंग्रजवाडीत केले वृक्षारोपण

Swarajyatimesmews

डिंग्रजवाडीत ६ वीच्या समर्थच्या उत्साहाचे सरपंच प्रसाद गव्हाणे यांच्याकडून कौतुक!

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अनेक ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी मुलांनी सहभाग नोंदवला खरा, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ६ वी मधील समर्थ मुंजाजी व्यवहारे या चिमुकल्याने. आपल्या अपंगत्वावर मात करत, एका हाताने वृक्षारोपणासाठी दिलेले त्याचे योगदान पाहून डिंग्रजवाडीचे सरपंच प्रसाद शांताराम गव्हाणे यांनी समर्थचे विशेष कौतुक करत त्याच्यासोबत फोटो काढत त्याला शाबासकी दिली.

जिद्दीला सलाम! वृक्षारोपणाच्या या मोहिमेत डिंग्रजवाडीतील अबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. झाडे लावण्याचे काम सुरू असताना, समर्थ व्यवहारे याने अतिशय जिद्दीने आणि उत्साहाने या कार्यात भाग घेतला. समर्थला एक हात नसतानाही, निसर्गाप्रती असलेल्या त्याच्या ओढीने आणि कष्टाने उपस्थित सर्वांनाच थक्क केले. शारीरिक उणीव असूनही पर्यावरणासाठी आपला ‘एक हात’ देणाऱ्या समर्थची ही जिद्द उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

सरपंचांकडून कौतुकाची थाप : डिंग्रजवाडीचे तरुण सरपंच प्रसाद शांताराम गव्हाणे यांना जेव्हा समर्थच्या या जिद्दीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ समर्थची भेट घेतली. “समर्थने आपल्या शारीरिक मर्यादांना मागे टाकून पर्यावरणासाठी जो पुढाकार घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. निरोगी मुलांपेक्षाही समर्थचा उत्साह मोठा होता,” अशा शब्दात सरपंच गव्हाणे यांनी त्याच्या जिद्दीचे वर्णन केले. गव्हाणे यांनी समर्थसोबत खास फोटो काढून त्याचे मनोबल वाढवले.

यावेळी डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थच्या या कृतीने ‘इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते’ हा संदेश संपूर्ण डिंग्रजवाडीत पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!