पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात रुजू होत आहेत.
अष्टपैलू अधिकारी सोमय मुंडे – आयपीएस अधिकारी असलेले सोमय मुंडे हे केमिकल इंजिनियर आहेत. त्यांचे वडील आणि आई दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मूळचे देगलूरचे असलेले मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर डेहराडूनमधून दहावी उत्तीर्ण करत, हैदराबाद येथे माध्यमिक पदवी मिळवली. पवई आयआयटीमधून त्यांनी केमिकल इंजिनियरिंगची पदवी संपादन केली.
नक्षलवादी विरोधी मोहिमांमधील शौर्य – २०१६ मध्ये आयपीएस झाल्यानंतर त्यांनी वैजापूरमध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम पाहिले. अमरावती येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर २०२१ मध्ये गडचिरोली येथे नक्षल ऑपरेशन्सचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांना लातूरचे पोलिस अधीक्षक पद देण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण मोहिमेची जबाबदारी सोमय मुंडे यांच्यावर होती. छत्तीसगडमधील अबुजमाळ आणि गडचिरोलीतील अटापल्ली येथे झालेल्या नक्षलवादी विरोधी कारवायांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गडचिरोलीत विशेष मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला, ज्यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे (ज्यावर ५० लाखांचे बक्षीस होते) याचाही समावेश होता. या धाडसी कामगिरीबद्दल २०२२ मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
पुण्यात नवीन जबाबदारी – यावर्षी मे महिन्यात गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार त्यांची लातूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावरून बदली झाली होती. आता अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून, ते पुणे शहराच्या उपायुक्त पदी कार्यरत होणार आहेत. शुक्रवारी गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यातील तब्बल ५२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये मुंडे यांच्यासह राजलक्ष्मी शिवणकर आणि कृषिकेश रावले यांचाही पुणे शहरात पोलिस उपआयुक्तांच्या पदावर समावेश आहे. पुणे शहर पोलिस दलात त्यांची नियुक्ती गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.