चाकण (ता. खेड) मुंबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्याजवळ मंगळवारी रात्री नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मिथून धेंडे (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना चिरडले. गाडी बंद केल्यानंतर ट्रक चालकाने गाडी पुन्हा सुरु करून ट्रक पळवत धेंडे यांच्यावर चढवला.त्यात ते गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोमाटणे येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे १४ मे हा त्यांचा वाढदिवस होता. पण त्याच्या आदल्याच दिवशी मृत्यूने त्यांना गाठले.अपघातानंतर ट्रकचालक चाकण एमआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्क करून पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक व त्याचा साथीदार फरार आहेत.
या घटनेने पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिथून धेंडे हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी व कुटुंबीय आहेत